Tuesday, September 05, 2006

गणपती बाप्पा मोरया!!!

[खरतर हा ब्लॉग व्यक्ती या category येत नाही. पण आपल्या घरी १० दिवस पाहुणा म्हणून येतो आणि सर्व 'व्यक्तीं'च्या दैनदिन जीवनात आनंदाचे चार क्षण टाकतो .. म्हणून त्या गणपती उत्सावविषयी मी इथेच लिहिणार आहे]

बहुतांशी पावसाळ्याचे दिवस.. तशी शाळा सुरू होवून महिना दीड महिना झालेला .. सहामाही परिक्षा अजून चार कोसावर असते.. त्यामुळे अभ्यासाचं फ़ार लोड नाही... सकाळ मधे 'गणपतीच्या मुर्ती बाजारात' अशी एक बातमी.. सार्वजनिक गणपती उत्सवाची वर्गणी गोळा करणारे कार्यकर्ते.. गणपतीच्या कार्यक्रमांची प्रॅक्टिस.. बाजारात विकायला आलेल्या सजावटीच्या वस्तू..हळू हळू चाहूल लागते गणेशोत्सवाची!
काहींकडे आधीपासून मूर्ती बुक केलेली असते.. काहींकडे खास पेण ला तयार केलेली मुर्ती त्यांचा तिथे राहणारा कोणी नातेवाइक खास त्यांच्यासाठी पाठवणार असतो.. तर क्वचित कोणी तयारही करतात म्हणे! मुर्ती कुठुनही आलेली असो.. दगडूशेठ टाएप असो वा मंडई.. किंवा मग साधी!! आपल्या मुर्ती वर कसं तेज आहे ह्याचा पु.ल.च्या भाषेत सांगायचं तर 'जाज्वल्य अभिमान' प्रत्येकाला असतो.. [ मी पुणेकरांविषयी बोलत आहे..] माझ्या घरी मात्र आधी बुक करण्याचं वगैरे करण्याचं प्लॅनिंग फ़ार क्वचितच होत.. नाही तसा आळशीपणा वगैरे नाही हो... 'Just-In-time' म्हणून काय ते जॅपनीज मॉडेल आहे ते आम्ही पाळतो! आदल्या दिवशी ७ च्या सुमारास आमचं डेकोरेशन काय करायचं याचा विचार सुरु व्ह्यायचा.. तशा लागणाऱ्या सर्व गोष्टी गावातून आणलेल्या असायच्या.. पण तरी काही आयत्या वेळी त्या लिस्ट मधून निसटलेल्या काही सटर फ़टर गोष्टी असायच्याचं.. मग आयत्या वेळी हनुमान कडे धाव घ्यायची! आमच्या सहकारनगर मधे हनुमान नावाची दोन प्रोव्हिजन स्टोअर्स होती अगदी शेजारी शेजारी.. एका दुकानाचा मालक लंगडा होता त्यामुळे हनुमान आणि लंगडा हनुमान ओळखायला सोप्प! हनुमानकडे तस सगळच मिळायचं आणि त्याच्याकडे नसेल तर लंगड्या हनुमानकडे हमखास मिळायचं.. आणि हनुमान कायम उघडा असायचा. सकाळी सहा ते रात्री बारा..शिवाय सामान घरी पोस्त करायला त्याच्याकडे वानरसेनाही होती..सतर्क customer support च अगदी परफ़ेक्ट उदाहरणं. तर सजावट करताना एखाद दोन चकरा पडायच्याच हनुमानकडे! ..सर्वात शेवटी सजावटीसाठी एलेक्ट्रिक चि माळ निघायची माळ्यावरून .. त्यातले काही बल्ब गेलेले असायचे.. मग ते गेलेले बल्ब झिरमिळ्यांच्या,खोट्या फ़ुलांच्या मागे लपवत मोठ्या खूबीनी ती माळ लावयची... एकदम झकास.. शेवटी फ़कफ़कणाऱ्या माळेच्या प्रकाशात काय उठून दिसायचं ते डेकोरेशनं!

मग ती स्पेशल सकाळ उजाडते...आई सकाळी नाष्ट्याला भरपूर पोहे करून [जेणेकरून आता तीन चार तास कोणी स्वयंपाकघरात घुटमळणार नाही].. मोदक करायच्या मागे लागते.. थोड्यावेळाने आजूबाजूच्या घरातून कुकरच्या शिट्टयांबरोबर घंटा आणि झांजांचे आवाज यायला लागतात!.. 'गणपती बाप्पा मोरया' ही ऐकू यायला लागतं .. म्हणजे कूणाकुणाकडे already मुर्ती घरी आणलेली असते.. आमच्या बांबाची अंघोळ मात्र राहिलेली असते.. पण आई चा पारा चढायच्या आत ती होते..मग आम्ही निघतो गणपती आणायला.. लहान पणी जितक्या सहजतेने आरोळ्या द्यायचो तितक्या सहज ते आता जमायचं नाही [ teenage मधे कशाची लाज वाटेल सांगता येत नाही].. म्हणून मग शेजरपाजरच्या बच्चे कंपनीला घ्यायचं बरोबर अरोळ्या द्यायला.. आता निघणार तेवढ्यात आजीच्या लक्षात येतं बाबांच्या डोक्यावर टोपी नाही ..जागेवर ठेवलेली 'कापडी टोपी ' कुणास ठाऊक कशी पण जागेवर नसते..शेवटी समोरच्यांकडून आणली जाते.. दुकनातून मग एक छानसी तेजस्वी मुर्ती select करतो.. आणि वाजत गाजत गणपती बाप्पा घरी येतात..हा सर्व sequence दर गणपतीत अगदी न चुकता होतो.. मग इतका वेळ ज्याची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण येतो.. ते पहिल्या दिवशीचे 'मोदकाचे जेवण'..मोदकची वरची टोपी उघडून त्यावर तूपाची धार सोडायची..आणि मग त्या तुपाचा एकही थेंब खाली पडू न देता गडप करायचा.. तुडुंब जेवण झाल्यावर एक चक्कर टाकायची सोसायटीच्या मांडवावर. पण तिकडे सगळं थंडच असायचं.. साधारण चार च्या सुमारास ढोल ताशाचे आवाज दुर कुठेतरी ऐकू यायचे. मधेच एकदम आमच्या सोसायटीत कोणीतरी ताशा टिमटिमायचं.. मग तिकडे लगेच धाव घायची. मुलं आधीच येऊन ढोल ताशाचं testing करत असायची..मग actual ढोल वाजवणारे लोक सुरु करायचे.. एकदम स्पुरण चढायचं .. मुलांचा गणपती डान्स सुरु झालेला असायचा.. एकदम दिमाखात सोसायटीच्या गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची.

आता रोज घरची आरती.. कधी शेजारी पाजारी ही जायचं आरतीला शिवाय सोसयटीची आरती असायचीच. पण वेगवेगळ्या घरातली माणसं एकत्र आली की आरती एकसारखी होणं मुश्कील.. प्रत्येकाच्या काही काही additions असतातं म्हणजे.. पुस्तकात असतं 'केशवाची नामदेव भावे ओवाळिती'.. मग तिथे कुणाकोणाचं 'केशवाची नामदेव माधवाची नामदेव' असतं.. किंवा 'आशाढी कार्तिकि भक्तजन येती' तर कोणाला साधुजन ही आणायचे असतात.. त्यामुळे 'भक्तजन येती हो साधुजन येती' ..'ते तू भक्तालागी पावसि लवलाहि' ..कुणाच्या मते फ़क्त भक्ताला नाही तर दासालाही देवी पावते.. म्हणून मग 'ते तू भक्तालागी ते तू दासालागी'.. 'क्लेशापासून सोडवी' .. पण काहींना नुसत्या क्लेशातुन नाही दु:खातुनही सुटायचं असतं.. त्यांमुळे 'क्लेशापासून सोडवी दु:खापासून सोडवी' असे एक ना अनेक ओळींवर आरती दुमत होवून ती आरती अडखळते.. काही dominating भक्त आपली ओळ इतक्या ठामपणे म्हणतात की इतरांना adjust करावचं लागतं... आरत्या म्हणून झाल्या की एक लांब ओम् येतो .. आणि सुरू होते 'मंत्रपुष्पांजली'. मग इतक्या वेळ म्हणायचे म्हणून आरती करणारे पण खडबडून जागे होतात. प्रत्येक जण स्वत:च्या सुरामधे हेल काढायला लागतो. ती म्हणत असताना आपण एक मोठे संस्कृत पंडित असल्यासारखं वाटायला लागतं.. कोणाचेही आकार ऊकार एकमेकांशी जुळत नाहीतं. असे 'हेलकावे' देतं शेवटच्या ॐ शांति शांति शांति ला सगळे एकत्र येतात.. तो गोंधळ ऐकून गणपती म्हणत असेल उद्यापासून नुसती फ़ुलं वाहिली तरी चालतीलं..

हे दहा दिवस विविध गुणदर्शनांनी प्रत्येक जणं आपापल्या परीनी लाडक्या बाप्पाला खूष करायचा प्रयत्न करत असतो. कारण एरावी कुठे शाळेत कॉलेजमधे वगैरे चांन्स नाही मिळाला तरी आपल्या सोसायटीचा गणपती म्हणजे हक्काचा! तिथे सर्वांना आपली हौस भागवायचा पुरेपुर चांन्स मिळतो. खूप वर्गणी जमली असेल तर मग बाहेरचे प्रोफ़ेशनल कलाकारही येतात कधी कधी. पण खरा रंग चढतो तो मात्र लोकल कलाकारांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहानी! कुणी एकांकिका बसवत, त्यात कलाकारांपेक्षा प्रॉमप्टर्स जास्त असतातं. कधी कधी त्या हिट जातात ,पडदा पडताच टाळ्यांचा कडकडाट होतो .. तर कधी एकांकिका इतक्या पडीक असतात कि बाहेर कुठे केली असती तर पडदा लवकर पडावा म्हणून सुरवतीपासून टाळ्या पडल्या असत्या.. पण इथे 'लोकल मैदानात' ती भिती नसते! गाण्याच्या मैफ़िलीमधे गाणी रेटली जातात.. नवशिक्यांचा सोलो पेटी /सोलो तबला क्वचित व्हॉयलिन सहन केली जातात.. त्या वर्षी च्या गाजलेल्या गाण्यावर डांन्स असतो. तो कसाहि असला तरी हिट होतो . आणि हमखास once more मिळतो.. एखादी 'लोकल' विषयांवर comedy असते. इथे कधी बक्षिसासाठी चुरस नसते.. का खुन्नस नसते.. सर्वजण मनापासून जीव ओतून सादर करतात आपली छुपी कौशल्य....यात भाग घेणाऱ्यांमधे सर्वात उत्साही अर्थात तरूण वर्ग, त्यांनतर महिला वर्ग.. पुरुष वर्गात आजोबा लोकं काय ते थोडाफ़ार उत्साह दाखवत असतील.. पण वयवर्ष ३०-५० मधला पुरुष वर्ग मात्र 'इतरांना जास्तीत जास्तं सधी द्यावी' अशा थाटात वावरत असतो. स्वत:च्या अपत्याचा कार्यक्रम बघायला देखील मारून मुटकुन आलेला असतो... महिला वर्गासाठी पाककला,रांगोळी, flower decoration असतं.. ते कमी म्हणून शिवाय आपणहून काही नाच/नाटक बसवतात....किती तो मोह! पण 'बाबा' लोकं मात्र या मोहपाशात कधी अडकत नाहीत.. या ऐहिक सुखात त्यांना काही interest नसतो..सुट्टीच्या वारी दुपारी जेव्हा या स्पर्धा रंगत असतात.. तेव्हा घरी राहून संथ लयीत घोरत ते सोफ़्यावर विराजमान झालेले असतात.. पुराणकाळातील त्या शेषनागावर विराजमान झालेल्या विष्णूसारखंच ..आणि मुख्य म्हणजे गणरायाच्या क्रूपेने त्यांची ही modern 'शेषशाही' disturb करायला कोणी उपस्थित नसतं..

पाहता पाहता अनंतचतुर्दशी येते.. मिरवणुक निघते.. सोसायटीच्या सर्व रस्त्यांवरून ती गेली पाहिजे असा सर्वांचा हट्ट पुरवला जातो.. गणपती साठी महिला वर्गानी रस्त्यावर रांगोळ्या काढून ठेवलेल्या असतातं काहींच्या घरापाशी मिरवणुक आली कि स्पेशल आरती होते.. पुढे ढोल तशाच्या तालावर बेभान झालेली तरूण मंडळी.. त्यामागे गुलालपासून दूर एक गोल करून त्यात टिपऱ्या,गर्भा करणारे महिला मंडळ .. भजनं, गाणी म्हणणारे भजनी मंडळ.. आणि सर्वात शेवटी... निवडणुका, शेअर्स, कंपन्यांचे राजकारण.. इत्यादि सामाजिक विषयांवर कुजबुजत असलेली बाबा मंडळी..खऱ्या अर्थान ती आता सार्वजनिक झालेली मिरवणूक वाजत गाजत लाडक्या मंगलमुर्ती चा निरोप घ्यायला निघते.. 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजराने वातावरण अजुनच भावूक होतं आणि मग त्या गजाननाला तिथून पाय काढणं अवघड होवून बसतं.. म्हणूनच बराच वेळ ती मिरवणूक रेंगाळत असते..मग मात्र इतर सार्वजिक गणपतींची गर्दी होवून पाण्यात traffic jam व्हायच्या आत बाप्पां जड अंत:करणानी सर्वांचा निरोप घेऊन आपल्या गावी प्रस्थान करतात.

Thursday, April 27, 2006

अव्वा आणि मावशी आजी

'शाळेची सुट्टी' म्हणल्यावर कुणाचं मनं रम्य आठवणीत जात नाही? मी माझा मधली ही चारोळी अगदी परफ़ेक्ट आहे..

आठवणींच्या देशातं
मी मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खूष असतं
पण येताना त्याला येववत नाही..

मी देखील माझ्या मनाला शाळेच्या त्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणीत पाठवायच टाळते.. जातानाचं ठीक आहे हो पण मन एकदा ठाण्याच्या टेंभी नाक्यावर रूळल की परत यायचं नाव घेत नाही.
सुट्टी लागायची तारीख आव्वांना कशी कळायची कुणास ठाऊक! लहान पणी वाटायच की आमच्या पावगी बाई पत्र पाठवायच्या त्यांना! अव्वा म्हणजे आमच्या मावशी आजीचे यजमान. रेल्वे मधून रिटायर होऊन बरीच वर्ष झाली होती.अव्वा नाव कस पडलं माहीत नाही.. बहुतेक ताई लहान पणी बोबड बोलायची तेव्हा हे नावं पडलं. मावशी आजी घरीचं असायची .. तिचं खरं नाव तर मला अजुन महीत नाही.. माझ्या आईची ती सख्खी मोठी मावशी. माझी आजी तिला 'बेबी' म्हणायची.. आई 'बेमावशी' .. आणि चाळीतली सर्वजण 'छोट्या' मामी.. मूलबाळ नव्हतं पण माझा दिलिप मामा ( आईचा लांबचा भाऊ) त्यांच्या कडेचं लहानाचा मोठा झाला.चाळीतल्या सगळ्याचं लहान मुलांना लळा होता त्यांचा. खूप लाड करायचे सगळ्या लहान मुलांचे.. त्यामुळे परिक्षा कधी संपते आणि कधी अव्वा येतात अस व्हायचं. त्यांनी कधी आम्हाला फ़ार वाट पाहायला लावल नाही. पांढरा झब्बा पायजमा.. डोक्यावर काळी टोपी ..हातात छत्री.. वयाने ६५ च्या आसपास असावेत..वयाच्या मानानी खूपच active होते. अव्वांच्या जीवनावश्यक गोष्टी दोनचं. चहा.. आणि पिवळा हत्ती सिगारेट.. अगदी नाईलाज झाला तर मग 'पनामा', पण इतर कोणते ब्रॅण्ड चालायचे नाहीत..अव्वांची दुसरी प्रिय गोष्ट म्हणजे त्यांची जुन्या स्टाइल ची 'काळी टोपी'.. त्यांना घरी रहायचा आग्रह करायचा असेल तर सरळ त्यांची टोपी लपवावी.. टोपी शिवाय ते जाणार नाही हे माहित असायच. आणि दर वेळेस टोपी लपवल्यावर नवीन घेणं त्या पेन्शनर खिशाला परवडणारं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आम्हाला ठाण्याला जायची घाई असायची त्यामुळे ही trick एरवी साठी होती.

पुण्याहून मुंबईला ट्रेन नी जाणे हे मी अजुनही तितकचं एन्जॉय करते..लोणवळ्याची चिक्की.. कर्जत चे वडे.. डोंगरची मैना.. थोडावेळ दारात ऊभं राहयचं.. सगळं इतक common पण तरी एकदम special !! गाडीत आम्ही काही हट्ट करायचो नाही.. आईनी तस सांगितलेला असायचं . पण ठाण्याला उतरल्यावर मात्र टांग्यातूनच जायचा हट्ट नेहमी असायचा.. एकदम छोटा प्रवास टांग्याचा. टेंभी नाक्यावर उतरायचं. तिकडून थोडा चालत गेल्यावर चाळीच्या वऱ्हांड्यात मावशी आजी वाट पहात असायची. गोल साडीतली साडेचार फ़ूट उंच आणि चेहऱ्यावर किचित हसू.. 'छोट्या मामी ' हे नाव मात्र तिला उंचीमुळे मिळालं नव्हतं. अव्वांच्या मोठ्या भावाला 'मोठे मामा' त्यांची बायको 'मोठ्या मामी' , अव्वा 'छोटे मामा' आणि मावशी आजी 'छोटया मामी' .. चाळीतल्या लोकांनी एकदम सुटसुटीत नावं ठेवली होती.

चाळीतला दिनक्रम एकदम ठरलेला.. एकदम Routine .. हे एकमेव Routine जे मला कधी बोरं झाल नाही. सकाळी उठायची घाई नाही.पण सकाळी वेळेत उठून गॅलरीत नाष्टा करत बसायचं. आजूबाजूला सगळे गडबडीत स्वत:च्या घाईत .. त्यांचं काय चाललय .. कोण काय करतय हे बघण्यात इतका टाइम पास व्हायचा.. मागच्या बाजूला खिडकीत बसल की खालची नळावरची war front मग थोडावेळ पुढच्या गॅलरीत .. तिकडे दाढी करायला पंक्त्ती बसायच्या.. आधी ऑफ़िस वाले .. नंतर सगळे पेन्शनर.. अव्वा मात्र त्यात नसायचे.. सकाळी लवकर उठून फ़ुलं आणायला जायचे.. म्हणजे morning walk व्हायचा.. फ़ूलं आणली की ती sort करायची...पुडे बनवायचे.. कोणाच्या देव्हाऱ्यात किती देव आहेत .. कोणाला किती फ़ुलं लागतात ते अव्वांना चोखं ठाऊकं .. पुडे तयार झाले कि वाटप करायचं काम माझ्याकडे...

मावशी आजी आत कायम कामात गुंतलेली..स्टोव्ह पाशी कायम काहीतरी चालू असायचं. दुपारी थोडी मोकळी होईल तोच मग केरवारे, कपड्यांच्या घड्या..दुपारचा चहा .. संध्याकाळची खाणे.. काम चालूच. त्या सुट्टीच्या २ महिन्यात कधीही तिने आम्हाला नावडता पदार्थ केल्याच मला आठवतं नाही.. आमच्या आवडीचं फ़िश.. चिकन करायचं.. आणि मग ब्राह्मणाच्या पोरी कशा फ़िश मटामटा खातात म्हणून मिश्कील हसायचं.. तिची एक मांजर होती.. तिचेही असेच लाड. रोज मासेवाली आली कि त्या मांजरी साठी स्पेशल वाटा.. मोठया मामींची आणि तिची चूल वेगळी होती. दिलिप मामा एकदिवसा आड जेवायचा दोघींकडे.. आम्ही मात्र कधी मोठया मामींकडे जेवलेल आवडायचं नाही तिला. मी मोठ्या मामींच्या कपाटातला हाजमोला खायचे लपून.. हे तिला कळल .. लगेच अव्वांना धाडल हाजमोला आणायला. आपल्या नातींना कोणी काही बोलू नये. आपल्या कडे आल्यावर त्यांना काही कमी पडून द्यायचा नाही यासाठी तिचा प्रयत्न.

असं दिवस भर नुसता खायचं खेळायचं .. मजा करायची.. मग मधे आधे कोणी लोक मामा आहेत का म्हणून विचारत यायचे..की उगाच अगाऊ पणा करत विचारायचे कोणते मामा? छोटे की मोठे ? समोरचा बुचकळयात पडला की "लग्न लावणारे का जागा दाखवणारे??" अव्वा लग्नाची 'स्थळं दाखवयचे' आणि मोठे मामा 'घरासाठी जागा'. क्वचित कोणी नको असलेला पहुणा आला तर 'निरोप' सांगून परतवून लावायचे..संध्याकाळ कधी व्हायची कळायचं नाही.. मग फ़िरायला जाणं.. रात्री चाळीत पत्त्यांचा अडडा.. कुल्फ़ी खायला तळ्यावर जायचं ..मामाला सुट्टी असली की मुंबई फ़िरायला जायचं. पाहता पाहता सुटटी संपायची.. आणि परत निघायचं.. पुण्याला पोचल्यावर आठवायचं की रोज शुध्द्लेखन करायला सांगितल होत बाईंनी .. मग उरलेल्या थोड्या दिवसात खरडून काढायचं.. शाळेच्या पहिल्या दिवशी सुट्टीत काय केलं म्हणून सांगताना कोणी दिल्ली पाहिली असायची .. कोणी केरळ तर कोणी राजस्थान.. आमचं मात्र ठरलेलं Destination व्यंकूबाईची चाळं आणि मग थोड फ़ुलवायचं असेल तर मामानी मुंबईतली दाखवलेली राणीचा बाग..चौपाटी वगैरे ठिकाण सांगयची.. पण कधी वाटलं नाही की पुढच्या सुट्टीत आपणही कुठेतरी दुसरी कडे जाऊ.. मन तृप्त असायचा अव्वा आणि मावशी आजीच्या लाडानी. आणि वाट पहायची पुढच्या सुट्टीच्या चाळीतल्या स्पेशल Routine ची!!